Tuesday, April 08, 2008

ऑलिम्पिकच्या निमित्ताने...

ऑलिम्पिक आता अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलंय. खेळांचा हा सर्वात मोठा सोहळा जसजसा जवळ येतोय, तसतशी त्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढत जातेय. आणि या वेळचं ऑलिम्पिक तर अगदी खास असणार आहे. कारण या खेळांचं यजमानपद आहे चीनची राजधानी बीजिंगकडे.
एरवी चीन म्हटलं की एक वेगळंच जग नजरेसमोर येतं. गूढ, रम्य जग, धुक्यात हरवलेलं- ओळखीचं तरिही पूर्णपणे अनोळखी... सगळ्या जगावर वचक निर्माण करण्याच्या तयारीत असलेला आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला देश, अशीच काहीशी चीनची प्रतिमा आहे. वर्षानुवर्ष हा देश जगापासून काहीसा तुटल्यासारखाच रहात आलाय. आधी त्या जगप्रसिद्ध भिंतीनं आणि मग साम्यवादाच्या लोखंडी पडद्यानं चीनला जगापासून दूर ठेवलं. त्यामुळं बाकीच्या जगात, चीनविषयी उत्सुकतेपेक्षाही संशयकल्लोळच जास्त आहे.
पण असं प्रवाहापासून वेगळं राहणा-या ह्या देशालाही आता मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आणि खासकरून पाश्चिमात्य देशांशी मैत्री करण्याचं महत्त्व समजू लागलंय. म्हणूनच गेल्या काही वर्षांत इथली बाजारपेठ खुली होऊ लागली.
अर्थात आजही आपलं वेगळेपण आणि वाढतं महत्त्व दाखवण्याची एकही संधी चीनी सरकार सोडताना दिसत नाही. ऑलिम्पिकचा त्याला अपवाद कसा असेल? या खेळांचं आयोजन करण्यासाठी बीजिंग शहरात मोठे फेरबदल करण्यात आलेयत. स्टेडियम्स आणि स्पोर्टस् सेंटर्सशिवाय अनेक नव्या इमारती बांधून तयार आहेत. काहींचं काम अजूनही सुरूय. ऑलिम्पिकच्या निमित्तानं जगभरातले लोक चीनमध्ये येणार आहेत. पण चीनमध्ये सगळा कारभार मँडेरियनमधनं चालतो. त्यामुळं पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हजारो लोकांना इंग्लिश बोलण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय. हॉटेल्समध्येही कॅन्टिनेन्टल फूड तयार करण्यावर भर दिला जातोय. बीजिंगच्या आकाशात एरवी दिसणारे प्रदूषणाचे ढग दूर करण्यासाठीही खास उपाय राबवले जात आहेत.
एकूणच ऑलिम्पिकच्या रुपानं चीनचं अत्याधुनिक आणि प्रगत रुपडं जगासमोर आणण्याचा इथल्या सरकारचा इरादाय. असं रूप की ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसेल. अर्थात चीनचं हे रुप म्हणजे चेहे-यापेक्षाही मुखवटाच आहे असं म्हणण्यास हरकत नाही.
चीनच्या आर्थिक प्रगतीचा आलेख आलेख कुणालाही थक्क करणारा आहे. पण त्या प्रगतीच्या आड दडलाय एक वेगळाच देश. आपल्य योजना राबवताना चीन सरकारनं वेळोवेळी मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचं उघड झालंय. तिबेटमध्ये तर गेली सहा दशकं दडपशाही सुरू आहे. येन केन प्रकारेण तिबेटवरची आपली मालकी सिद्ध करण्यासाठी चीन सरकारचे प्रयत्न सुरू असतात. आणि केवळ एवढ्याचसाठी चीननं ऑलिम्पिक ज्योत एव्हरेस्टवर नेण्याचा घाट घातलाय.
अर्थात ऑलिम्पिकचा वापर करण्यात तिबेटही मागे नाही. आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी, आपल्या संस्कृतीचं रक्षण व्हावं यासाठी तिबेटी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. आता ऑलिम्पिकच्या निमित्तानं आपल्या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधून घेण्याची मोठी संधीच त्यांना मिळाली आहे. म्हणूनच तर ऑलिम्पिक ज्योतीच्या प्रवासात अडथळे आणण्यासही ते मागेपुढे पाहात नाहीत. तर असा कोणताही विरोध मोडून काढण्यासाठी चीनचं सरकारही कोणत्याही थराला जाऊ शकतं. म्हणूनच ज्योतीचा शांततामय प्रवास सध्या चांगलाच पेटलाय. आणि खेळ जसजसे जवळ येत जातील तसा हा विरोधही वाढत जाईल यात शंका नाही.
चीनबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची आणखी एक तक्रार आहे ती इथं प्रसारमाध्यमांवर, विशेषतः इतर देशांतील पत्रकारांवर असलेल्या बंधनांबाबत. ऑलिम्पिक कव्हर करणा-या परदेशी माध्यमांवर कोणताही दबाव आणला जाणार नाही असं आश्वासन तर चीन सरकारनं दिलंय. पण चीनच्या इतर गोष्टींप्रमाणेच या आश्वासनांवरही किती विश्वास ठेवावा असा प्रश्न जगभरातील माध्यमांमधून विचारला जातोय. बाकी काही असो, ऑलिम्पिकच्या निमित्तानं चीनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्याचा फायदा प्रसारमाध्यमांना आणि चीनी नागरिकांनाही होऊ शकतो. आता ऑलिम्पिकचं आयोजन ही चीनसाठी आणि पर्यायानं जगासाठीही एक नवी सुरूवात ठरणार का हे लवकरच कळेल. फक्त चारच महिने वाट पहा...
- जान्हवी मुळे

1 comment:

S U J A Y S said...

Atishay chaan mandanicha lekh baryach divsanantar vachayla milala.Good going.Tula jar me ekhada vishay dila tar tyavar lekh lihishil ka?