Friday, April 11, 2008

इस्लामाबाद टू बँकॉक व्हाया नवी दिल्ली

राजधानी नवी दिल्ली मोठ्या उत्सुकतेनं सतरा एप्रिलची वाट पाहतेय. जागोजागी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात येतेय. संसदभवन परिसरात अगदी प्रजासत्ताक दिनाला असते तितकी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राजपथाभोवती तर सगळीक़डे कंमांडोजचं कडं उभं करण्यात येतंय. काही तासांसाठी दिल्लीच्या काही भागांत वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे. नाही, १७ तारखेला दिल्लीत कोणत्याही देशाचा राजनेता येत नाहीए. ही सगळी तयारी चाललीय ती ऑलिम्पिक ज्योतीच्या स्वागतासाठी, या ज्योतीच्या दिल्लीतील प्रवासात व्यत्यय येऊ नये यासाठी...

ऑलिम्पिकची ज्योत इस्लामाबादमधून लवकरंच भारतात येणार आहे आणि तिथून पुढे बँकॉकसाठी रवाना होणार आहे. एरवी ही ज्योत म्हणजे विश्वशांतीचं प्रतिक. पण यंदा या ज्योतीचा प्रवास चांगलाच पेटलाय. आपल्या प्रवासात या ज्योतीला ठिकठिकाणी चीन विरोधी निदर्शनांचा सामना करावा लागतोय. लंडन आणि पॅरिसमध्ये या निदर्शकांना हिंसक वळण लागलं होतं.


लंडनमध्ये एका तिबेट समर्थकानं ऑलिम्पिक ज्योत हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर पॅरिसमध्ये निदर्शनं हाताबाहेर गेल्यानं टॉर्च रिले आटोपता घ्यावा लागला. याच दरम्यान सुरक्षिततेसाठी पॅरिसमधल्या पोलिसांना ज्योत विझवावी लागल्याचं वृत्त आलं. नंतर सॅनफ्रान्सिस्कोमध्येही ज्योतीच्या विरोधाची आग पसरली. रिचर्ड गेअरसारखे तिबेट समर्थक हॉलिवूड कलाकारही त्या विरोधात सामील झाले. त्यानंतर निदर्शनांचा जोर काहीसा थंडावला. पण चीन सरकारची चिंता अजून संपलेली नाही. कारण या ज्योतीला अजून एक महत्त्वाचा टप्पा पार करायचाय आणि याच टप्प्यावर म्हणजे भारतात ऑलिम्पिक ज्योतीला कडवा विरोध होण्याची शक्यता आहे. कारण तिबेटचं श्रद्धास्थान आणि लाडके नेते दलाई लामा यांच्यासह अनेक तिबेटी नागरिक गेली सहा दशकं भारताच्या आश्रयाला आहेत. भारतीयांबरोबर त्यांचं मैत्रीचं नातं आहे. चीनशी मैत्रीपूर्ण संबंध असूनही भारतीयांना भावनिकदृष्ट्या तिबेटच जवळचा वाटतो. याच भावनिक नात्याचा परिणाम म्हणून आपल्या फुटबॉल संघाचा कर्णधार बायचुंग भुतियानं टॉर्च रिलेमधनं नाव मागे घेतलं. भारतीय अधिका-यांनी मात्र मात्र एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ऑलिम्पिक ज्योत ही काही चीनची मक्तेदारी नाही, तर तो एक जागतिक वारसा आहे. तरिही या ज्योतीला इतका विरोध का व्हावा? तिबेटी नागरिकांसाठी ही एक संधी आहे- ऑलिम्पिकच्या निमित्तानं आपले प्रश्न, चीनच्या अधिपत्याखाली तिबेटमध्ये होणारा अन्याय यांना वाचा फोडण्याची. आणि त्याचा ते पुरेपूर वापर करून घेत आहेत. आणि का करू नये? चीनचं सरकारही ऑलिम्पिकच्या माध्यमातून आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी झटतंय. अर्थात यामध्ये कुठही या ज्योतीला किंवा ऑलिम्पिकच्या परंपरेला मात्र धक्का पोहोचणार नाही ना याची काळजीही घ्यायला हवी.पण ऑलिम्पिकच्या राजकीय पटावर दोन्ही बाजूंना होणा-या या हालचालींचे परिणाम नेहमीप्रमाणे सर्वसामन्यांनाच भोगावे लागतायत. भारतही त्याला अपवाद नाही. दिल्लीत होणा-या टॉर्च रिलेमध्ये अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटीज सहभागी होतील. पण सुरक्षेच्या कारणांमुळं सर्वसामान्यांना ज्योतीपासून लांबच ठेवण्यात येणार आहे. म्हणजे शेवटी लोकांना एकत्र आणणारी ही ज्योत लोकांपासूनच दुरावणार, नाही का? याचाही विचार व्हायलाच हवा.