Sunday, February 10, 2008

फेडरर नाबाद २०९


शिखरावर पोहोचणं सोपं असतं, तिथं टिकून राहणं मात्र कठीण असतं. उंचावरचे वारे सगळ्यांनाच सोसवत नाहीत. पण रॉजर फेडररची गोष्टच निराळी. टेनिसमधल्या सर्वोच्च शिखरावर तो नुसता पोहोचलाच नाही तर तब्बल २०९ आठवडे तिथं फक्त त्याचंच वास्तव्य आहे. 2 फेब्रुवारी 2004 रोजी फेडररनं टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आणि तेव्हापासून ते फक्त त्याचंच आहे. विशेष म्हणजे सलग चार वर्ष नंबर वन असूनही त्याच्यातली विनम्रता जराही कमी झालेली नाही.


चार वर्षांच्या काळात टेनिसविश्वातले अनेक विक्रम मोडीत निघाले. अनेकदा इतिहास नव्यानं रचला गेला. आणि काही थोडे अपवाद वगळता तो इतिहास लिहीणारा फेडररच होता. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल सोडला तर इतर कोणीही फेडररवर वरचढ ठरला नाही. नदालनंही केवळ क्ले कोर्टवरच फेडररला रोखून धरलंय. एक फ्रेन्च ओपन आणि दुसरं ऑलिम्पिक सुवर्णपदक यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळ्या मोठ्या स्पर्धांवर फेडररनं ताबा मिळवला. आणि यंदा या दोन्ही स्पर्धा जिंकायचाच त्याचा इरादा आहे.


मात्र फेडररसाठी या पुढचं आव्हान सोपं नाही. याची जाणीव गेल्या वर्षीच्या यू एस ओपनमध्येच झाली होती. स्पर्धेचं जेतेपद अर्थातच फेडररनं मिळवलं पण अंतिम फेरीच्या सामन्यात सर्बियन सुपरस्टार नोवाक ज्योकोविचनं त्याला चांगलंच सतावलं होतं. त्या पराभवाची परतफेड ज्योकोविचनं यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये केली. आणि गेल्या चार वर्षात फेडररवर एकापेक्षा जास्त वेळा विजय मिळवणारा तो केवळ चैथा खेळाडू ठरलाय. (फेब्रुवारी 2004 नंतर नोवॅक ज्योकोविच आणि गियेर्मो कनास यांनी प्रत्येकी दोनदा, डेव्हिड नॅलबॅन्डियननं तीनवेळा तर राफेल नदालनं आठ वेळा फेडररला पराभूत केलंय.)


खरंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याआधी फेडररला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास जाणवत होता. अवघ्या दोन-तीन दिवसांत त्याचं वजनही तीन किलोनं कमी झालं. त्यामुळं त्यानं कुयाँग क्लासिक स्पर्धेतनं माघार घेतली. कोणत्याही सरावाशिवाय ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताना आजारातून उठलेल्या फेडररचा खेळ बराच मंदावल्यासारखा वाटला. फेडररला हरवता येऊ शकतं अशी कुजबूज मेलबर्न पार्कवर सुरू झाली आणि ज्योकोविचनं ती प्रत्यक्षात आणली. चार वर्षांत पहिल्यांदाच फेडररच्या अव्वल स्थानाला धोका निर्माण झालाय.


तरीही तो मेलबर्नमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकला याचं कारण एकच – तो रॉजर फेडरर आहे. टेनिसच्या सर्वोच्च शिखरावर तो सध्या राज्य करतोय. अव्वल स्थानावर टिकून राहण्याचा मंत्र त्याला अगदी पुरेपुर माहीत आहे आणि हा मंत्र आहे मेहनत, मेहनत आणि अखंड मेहनत....

No comments: